मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेंद्र मिश्र, छ.संभाजीनगर परिक्षेत्र यांनी आज बीड जिल्हा पोलीस दलाची सविस्तर आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी प्रतिबंध तसेच पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा आढावा घेतला.बैठकीदरम्यान मालमत्तेविरुद्ध दाखल होणारे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रत्येक प्रभारी अधिकारी यांनी विशेष मेहनत घ्यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढविणे, आरोपींचा जलद शोध घेणे व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे यावर त्यांनी भर दिला.पोलीस स्टेशन हद्दीत जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था व प्रशासनाशी समन्वय साधून ठोस प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. सीसीटीव्हीमुळे गुन्हे प्रतिबंधास मदत होईल तसेच गुन्हे उघडकीस आणण्यास गती मिळेल, असे त्यांनी नमूद केले.अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देत अवैध गुटखा विक्री, अवैध अग्निशस्त्र बाळगणे तसेच इतर बेकायदेशीर कृत्यांवर जास्तीत जास्त कारवाया कराव्यात, असे त्यांनी सांगितले. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर, विशेषतः विना हेल्मेट वाहन चालविणारे व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर नियमित व प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश दिले.याच बैठकीत सन २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. MPDA अंतर्गत जास्तीत जास्त इसमांना स्थानबद्ध करण्याबाबत उल्लेखनीय कार्य करणारे पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ, शितलकुमार बल्लाळ व शरद जोगदंड यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रात्रगस्त दरम्यान प्रभावी कारवाई करणारे बीड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदिप नेवरे आणि बीड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गुंड व अंमलदार यांनाही प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी बैठकीस मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेंद्र मिश्र यांचेसह पोलीस अधीक्षक श्री.नवनीत कॉंवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व जिल्ह्य़ातील पोलीस अधिकारी हजर होते.







