महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने दर्पणकार पुरस्कार सोहळा शानदार रंगला…
बीड (प्रतिनिधी):- बीडची पत्रकारिता ही परखड आणि प्रगल्भ आहे. पत्रकारांच्या ज्या समस्या मला पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे आणि या कार्यक्रमानिमित्त उपस्थित पत्रकार बांधवांनी प्रामुख्याने सांगितले ते प्रश्न सोडविण्यासाठी मी पत्रकारांचा आवाज विधानसभेच्या सभागृहात पोहचवेल आणि न्याय देण्याचा प्रयत्न करेल अशी ग्वाही बीड विधानसभेचे आमदार संदीपभैय्या क्षीरसागर यांनी दिली. तर बीडच्या पत्रकारितेला लोकश्रय असल्यामुळे ती प्रगल्भ आणि निर्भिड आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी व्यक्त केले.येथील स.मा.गर्गे भवन येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा बीडच्यावतीने दर्पण दिनानिमित्त दर्पणकार पुरस्काराचे शानदार वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे लाभले. व्यासपीठावर पत्रकार संघाचे मार्गदर्शक संतोष मानुरकर यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून बीड विधानसभेचे आ. संदीपभैय्या क्षीरसागर, माजी आ.उषाताई दराडे तसेच उपविभागीय जिल्हाधिकारी करिश्मा नायर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक सचिन पांडकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक देशमुख, संपादक संघाचे अध्यक्ष नरेंद्र कांकरिया, ज्येष्ठ पत्रकार महेश वाघमारे, मुंबई येथून आलेले विशेष सत्कारमूर्ती पश्चिम भारत पी.टी.आय.प्रमुख विलासजी तोकले यांच्यासह सत्कारमूर्ती सर्वश्री ज्येष्ठ संपादक सर्वोत्तम गावरस्कर, मकदुम काझी, सी.आर.पटेल, अनिल भंडारी, महेंद्र मुधोळकर, संग्राम धन्वे, संतोष ढाकणे, आष्टीचे ज्येष्ठ पत्रविक्रेते भिमराव गुरव आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना आ.संदीपभैय्या क्षीरसागर म्हणाले, आज प्रिंट मिडीयासह, इलेक्ट्रॉनिक मिडीया, सोशल मिडीया अगदी फास्ट झाली आहे. चुकूनही चुकीचं बोलणे कधी आंगलट येईल हे सांगता येत नाही. बीडमध्ये तर पत्रकारांच्या नजरेतून चुकीला माफीच नाही. बीडची पत्रकारिता डोळ्यात अंजन घालणारी असून ही बाब कौतुकास्पदच म्हणावी लागेल. पत्रकारांच्या आर्थिक प्रगतीकरीता ग्रामपंचायत अंतर्गत 5 हजार रुपयांपर्यंत अंक खरेदीला परवानगी आणि पत्रकारांच्या पेन्शन संदर्भात ज्या प्रमुख अडचणी आहेत त्या अडचणीसह इतर ज्या काही अडचणी आहेत त्या सोडविण्यासाठी मी विधानसभेच्या सभागृहात प्रामुख्याने हा विषय मांडेल आणि न्याय देण्याचा प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली. अध्यक्षीय समारोपात पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले, बीडच्या पत्रकारितेमध्ये उपजतच लेखणीची कला आहे. बीडच्या पत्रकारितेला व्यावसायिक अथवा राजकीय राजाश्रय अपेक्षित नसतांना सुध्दा बीडची पत्रकारिता प्रगल्भ असून रोखठोक लिहीणारी आहे. बीडच्या पत्रकारितेला केवळ लोकाश्रय असल्यामुळेच हे शक्य आहे असे मत व्यक्त केले. या प्रसंगी माजी आ.उषाताई दराडे म्हणाल्या, बीड जिल्हा मागास आहे असे मी मानत नाही तर बीड जिल्हा पुरोगामी असून आज देशाचे संविधान,लोकशाही धोक्यात असून ती वाचविण्यासाठी माध्यमातील पत्रकारांनी स्वातंत्रपूर्व पत्रकारितेप्रमाणे पुन्हा एकदा सामाजिक चळवळ म्हणून पुढे येणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. या प्रसंगी संपादक नरेंद्र कांकरिया यांनी आज शासन आणि प्रशासन दोघेही संवेदनशील राहिलेले नाहीत अशी खंत व्यक्त करुन पत्रकारांनी एकत्रित लढा देवून आपल्या समस्या सोडविल्या पाहिजेत असे मत व्यक्त केले. यावेळी सत्कारमूर्ती विलास तोकले, संपादक मकदुम काझी आणि संपादक सर्वोत्तम गावरस्कर यांनी पत्रकारितेतील आलेले अनुभव व्यक्त करुन विस्तृत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात पत्रकार संघाचे मार्गदर्शक दै. दिव्य लोकप्रभाचे संपादक संतोष मानुरकर यांनी पत्रकार संघाच्या विविध उपक्रमाबद्दल आणि बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार सोहळ्यामागील भूमिका स्पष्ट करुन हा पुरस्कार सोहळा पत्रकारांची उंची वाढवणारा ठरत आहे असे मत व्यक्त केले. या पुरस्कार सोहळ्याला बीडसह जिल्हाभरातील पत्रकार, पत्रकार प्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सुत्रसंचलन आणि आभार पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी मानले.
या मान्यवरांचा दर्पणकार म्हणून झाला सन्मान बीडचे भूषण दर्पणकार म्हणून पश्चिम भारत प्रमुख विलास तोकले, बीडचे दर्पणकार म्हणून दै.सुराज्यचे संपादक सर्वोत्तमआण्णा गावरस्कर, उर्दु दर्पणकार म्हणून दैनिक तामीरचे संपादक मकदुम काझी, इंग्रजी दर्पणकार म्हणून लोकमत टाईम्सचे बीड जिल्हा प्रतिनिधी सी.आर.पटेल, हिंदी दर्पणकार म्हणून दै.लोकमतचे उपसंपादक अनिल भंडारी, इलेक्ट्रॉनिक मिडीया दर्पणकार म्हणून टी.व्ही.9 चे बीड जिल्हा प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर, न्युज पोर्टल दर्पणकार म्हणून मुंबई मराठीचे संग्राम धन्वे, यु.ट्युब चॅनलचे दर्पणकार म्हणून संतोष ढाकणे, अब्दुल कलाम वैचारिक दूत दर्पणकार म्हणून आष्टी येथील वृत्तपत्र विक्रेते भिमराव गुरव या सत्कारमूर्तींना मान्यवरांच्या शुभहस्ते शाल,श्रीफळ,सन्मनापत्र, सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.