बीड, दि. १ जुलै : पत्नीच्या मृत्यूप्रकरणी प्रभावी व शास्त्रशुद्ध तपास करून दोषारोप सिद्ध करण्यात तलवाडा पोलिसांना यश आले असून, आरोपी पतीला न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजुरी व ₹१०,००० दंड अशी शिक्षा सुनावली आहे.मा. अतिरिक्त सत्र न्यायालय-२, बीड (मा. न्यायाधीश सौ. जयश्री आर. पुलाटे) यांनी सेशन केस क्र. ११४/२०२३ मध्ये आरोपी सुरेश उर्फ चित्तेश्वर गुलाब राठोड यास भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (भाग-२) अंतर्गत दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास भोगावा लागणार आहे.१९ मार्च २०२३ रोजी रात्री भेंडटकळी तांडा (ता. गेवराई) येथे कौटुंबिक वादातून आरोपीने पत्नी सविता राठोड यांच्या डोक्यात मोठा दगड मारून गंभीर दुखापत केली होती. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर २० मार्च २०२३ रोजी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ७१/२०२३ दाखल करण्यात आला होता.तपासादरम्यान शवविच्छेदन अहवाल, रक्तरंजित दगड, रक्तमिश्रित माती, बांगड्यांचे तुकडे, रासायनिक विश्लेषण (सी.ए.) अहवाल तसेच परिस्थितीजन्य पुराव्यांची अखंड साखळी न्यायालयात प्रभावीपणे सादर करण्यात आली. या भक्कम पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्ध दोष सिद्ध झाला.या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर श्रीराम वाघमोडे यांनी केला. सरकारी अभियोक्ता बी. एस. राख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. पोलिस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोषसिद्धीसाठी पोलिस पथकाने विशेष परिश्रम घेतले.या निकालामुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये वैज्ञानिक व परिणामकारक तपासाच्या बळावर दोषसिद्धी मिळविण्याच्या बीड पोलिसांच्या कार्याला पुन्हा एकदा यश मिळाले आहे.







