पिंपरी | प्रतिनिधी | दि. ७ जुलैआंबेडकर नगर, थरमॅक्स चौक येथील महावितरणच्या (एमएसईडीसीएल) सबस्टेशनपासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर असलेल्या वीज वितरण यंत्रणेची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. वीज खांबांवर व विद्युत वाहिन्यांवर मोठ्या प्रमाणात वेली व झुडपे वाढल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.मंगळवारी रात्री ८ वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित असून, बातमी लिहिपर्यंत अनेक घरांमध्ये अंधाराचे साम्राज्य होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सबस्टेशन अगदी जवळ असूनही महावितरणकडून नियमित देखभाल केली जात नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. वीजवाहिन्यांवर वाढलेल्या वेली व झुडपांमुळे शॉर्टसर्किट व अपघाताचा धोका वाढला असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.नागरिकांनी महावितरण प्रशासनाने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करून परिसरातील वीजवाहिन्यांवरील वेली व झुडपे हटवावीत तसेच नियमित देखभाल करावी, अशी मागणी केली आहे.छायाचित्र : आंबेडकर नगर, थरमॅक्स चौक परिसरातील वीजवाहिन्यांची दयनीय अवस्था.






