पिंपरी, दि. १२ नोव्हेंबर २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने, महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करून प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १४ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२५ ही मुदत देण्यात आली आहे. या काळात नागरिकांकडून प्रारूप मतदार यादीवर येणाऱ्या हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह अशा क्षेत्रीय कार्यालयानिहाय अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती प्राधिकृत अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिली.






