मुस्लिम समाजाला टार्गेट करू नये – अर्शद खान

पिंपरी-चिंचवड, दि. ०८ जून २०२६(प्रतिनिधी): महापालिकेने दुजाभाव न करता अनधिकृत बांधकामांविरुद्ध सरसकट कारवाई करावी. पारदर्शक कारवाई अपेक्षित असून कारवाई करताना कायद्याला अनुसरून जिथे अनधिकृत बांधकामे आहेत ती जमिनदोस्त करावीत. केवळ विशिष्ट समाजाला टार्गेट करू नये अशा आशयाचे निवेदन अर्शद अस्लम खान आणि चिखली कुदळवाडीतील रहिवाशांनी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त अतिक्रमण विभाग तृप्ती सांडभोर यांना (दि.८) दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की,शहरातील इतर अनधिकृत बांधकामे जशी दंड आकारून नियमित केली गेली, तशीच संधी चिखली-कुदळवाडीतील रहिवाशांनाही द्यावी.अनेक वर्षांपासून राहणाऱ्या कुटुंबांना पाणी, मलनिस्सारण यासारख्या मूलभूत सुविधा अजूनही मिळालेल्या नाहीत. 10/04/2026 रोजी झालेल्या कारवाईत प्रार्थनास्थळासह दुकाने, लहान उद्योग, राहती घरे जमिनदोस्त करण्यात आली. यामुळे रहिवाशांमध्ये असुरक्षितता व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मुस्लिम समाजबांधव अनधिकृत बांधकामे नियमितीकरण करण्यास तयार आहेत. त्यांना संधी देऊन नियोजित अतिरिक्त कारवाई स्थगित करावी, अशी मागणी अर्जदारांनी केली आहे.






