कामात प्रामाणिक असलेली व्यक्ती चूक झाली तर माफी मागायलाही संकोच बाळगत नाही. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी याचा परिचय दिला. मध्य प्रदेशात 400 कोटी रुपये खर्चूनही रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने त्यांनी ‘तुम्हाला त्रास झाला, मला माफ करा’ अशा शब्दांत जनतेची जाहीर कार्यक्रमात माफी मागितली.
इतकेच नव्हे तर जुना करार रद्द करून नव्याने निविदा मागवण्याचे आदेश त्यांनी दिले.मध्य प्रदेशातील मंडला येथे 1261 कोटींच्या एकूण 329 किलोमीटर लांब पाच राष्ट्रीय राजमार्गांच्या कामाचा शिलान्यास करण्यासाठी नितीन गडकरी हे सोमवारी मध्य प्रदेशातील मंडला येथे आले होते. मंडला ते जबलपूर मार्गावर बरेला ते मंडला असे 400 कोटी रुपयांचे 63 किलोमीटरचे काम होत आहे. त्या रस्त्याच्या कामावर आपण समाधानी नसल्याचे गडकरी म्हणाले तेव्हा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह सर्वच उपस्थित चकित झाले. ‘बरेला-मंडला रस्त्याच्या कामावर मी समाधानी नाही. या रस्त्यामुळे तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याबद्दल मला माफ करा. झालेले काम आधी दुरुस्त करा, नव्याने कंत्राट काढा आणि लवकरात लवकर रस्ता पूर्ण करून द्या असे आपण अधिकाऱ्यांना सांगितले आहे,’ असे गडकरी म्हणाले.पद जाते त्या दिवशी सर्व काही संपते!तुमच्याकडे पद आहे तोपर्यंत सर्वकाही आहे. आज मी झेड प्लस सुरक्षा पॅटेगरीत आहे; ज्या दिवशी पद जाईल त्या दिवशी सर्व काही संपेल, असे नितीन गडकरी जबलपूर येथे भगवतीधर वाजपेयी यांच्या जयंती कार्यक्रमात म्हणाले. ते म्हणाले की, ‘मुख्यमंत्री पुढे जाऊन माजी मुख्यमंत्री होतात. खासदार पुढे माजी खासदार होतो. आमदार माजी आमदार होतो. नगरसेवक माजी नगरसेवक होतो, पण कार्यकर्ता कधीच माजी कार्यकर्ता होत नाही.’