बीड प्रतीनीधी :काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस भरतीमध्ये घोटाळा (Police Bharti Scam) झाल्याचे समोर आले होते. यावेळी झालेल्या पेपर फुटी प्रकरणांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आता याच प्रकरणात बीड (Beed) कनेक्शन समोर आले आहे. कारण या पेपर फुटीप्रकरणात बीड जिल्ह्यातील तब्बल 33 जणांना समावेश असून, आतापर्यंत पोलिसांनी वीस जणांना अटक केली आहे. तर यामधील 13 आरोपी याद्यापी फरार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या या पोलीस भरती पेपर फुटी प्रकरणात एकूण 149 आरोपी असून, यातील 33 आरोपी हे बीड जिल्ह्यातील असल्याने पुन्हा एकदा पोलीस भरती पेपर फुटीचा बीड कनेक्शन उघड झाला आहे. 2019 मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर 2021 मध्ये ही परीक्षा पार पडली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत झालेल्या या पोलीस भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या समोर आले होते. मैदानी आणि लेखी परीक्षेत हे गैरप्रकार झाले होते. या सर्व प्रकरणाची चौकशी केल्यानंतर 149 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये बीडमधील 20 जणांचा समावेश असून, इतर 13 जण हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.विशेष म्हणजे, या वर्षी झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून समांतर आरक्षणाचा लाभ घेण्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात देखील गडचिरोली, यवतमाळ, लातूर मिराभाईंदरसह इतर ठिकाणी बीडच्या उमेदवारांवर यापूर्वी ही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातच आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असून, यातही बीड कनेक्शन समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यात रॅकेट सक्रिय?
वेगवेगळ्या जिल्ह्यात शासकीय सेवत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात बीड जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील तरुणांमध्ये शासकीय नोकरीचा क्रेझ पाहायला मिळतो. त्यात ग्रामीण भागात नेहमीच दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतात खूप उत्पन्न होत नसल्याने तरुण शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करतात. त्यामुळे स्पर्धा परीक्षा आणि विशेष करून पोलीस भरतीसाठी अनेकजण तयारी करतात. त्यामुळेच याचाच फायदा घेत काहीजण या तरुणांना नोकरी लावण्याची आमिष दाखवून त्यांची फसवणूक करतात. त्यामुळे मागील काही दिवसांत होणाऱ्या अनेक घोटाळ्यात बीड कनेक्शन समोर येत आहे. तर जिल्ह्यात या संबधित रॅकेट सक्रीय आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.