पिंपरी । प्रतिनिधी‘इपीएफओ’ कार्यालयाची सुंदर वस्तू निर्माण होणार आहे. त्याचा फायदा सर्व ‘पीएफ’ लाभधारकांना होणार आहे. माझे वडील ‘एचए’ फॅक्टरीमध्ये काम करत होते. माझे शिक्षण ‘एचए’ शाळेत झाले आहे. तसेच, ज्या जागेवर कार्यालय होणार आहे, तेथे पूर्वी आमचे घर होते. माझा जन्म येथेच झाला होता. ज्या ठिकाणी आपण भूमिपूजन करणार आहोत, तेथे माझ्या आईचे तुलसी वृंदावन होते. माझ्या आईचे गेल्या महिन्यात निधन झाले आहे. येथे भूमिपूजनासाठी आल्याचा मला खूप अभिमान वाटत आहे. या इमारतीच्या उभारणीसाठी आणि पीएफ लाभधारकांना चांगली सेवा देण्याबाबत जी मदत लागेल, ती लोकप्रतिनिधी या नात्याने देण्यास कटिबद्ध आहे, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (EPFO) पिंपरी येथे पुणे क्षेत्रीय कार्याल्याची केंद्रीय राज्य मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी सकाळी नवी दिल्ली येथून ऑनलाईन पद्धतीने पायाभरणी केली. त्यावेळी आरती अहुजा (आय.ए.एस, सचिव, कामगार आणि रोजगार मंत्रालय, केंद्र सरकार) व नीलम शमी राव (आय.ए.एस, केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त), एम.एस.के.व्ही.व्ही सत्यनारायण, (अतिरिक्त केंद्रीय भविष्य निधी आयुक्त, पुणे झोन), अमित वशिष्ठ (क्षेत्रीय भविष्य निधी, आयुक्त 1), के रवींद्र कुमार (क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त 1), मिलिंद पल्हाडे (व्यवस्थापक, हिंदुस्तान एंटीबायोटिक्स लिमिटेड), मनोज माने (क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त 2), आदित्य तलवारे (क्षेत्रीय भविष्या निधी आयुक्त 2) व भविष्य निधी संघटनेचे इतर कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते.**कशी असेल इमारत?केंद्रीय रसायन आणि खते मंत्रालयाच्या हिंदुस्तान एंटीबायोटिक्स लिमिटेडकडून (एच.ए.एल) 3.5 एकर जमीन पुणे क्षेत्रीय कार्यालय इमारत आणि निवासी क्वार्टर्स बांधण्यासाठी घेण्यात आली आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (सी पी डब्ल्यू डी) यांनी नियोजित कार्यालय इमारतीचे डिझाईन तयार केले आहे. या इमारतीत सात मजले आणि निवासी क्वार्टर्स असतील. त्यांचा एकूण बिल्टअप एरिया 31,770.43 चौमी असेल. ऊर्जेची बचत करण्यासाठी ग्रीन बिल्डिंग नियम पाळले जातील. दिव्यांगांच्या सोयीसाठी एक्सेस इंडिया स्कीम नियम पाळले जातील.