पिंपरी, दि. १३ ऑक्टोबर २०२२ :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू अथवा देणगी स्विकारु नये. तसे आढळून आल्यास संबंधित अधिकारी अथवा कर्मच्या-यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे. याबाबत स्वतंत्र परिपत्रकाद्वारे सर्व विभाग आणि विभाग प्रमुखांना स्पष्टपणे कळवण्यात आले आहे. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारत आणि क्षेत्रीय कार्यालये तसेच इतर ठिकाणच्या कार्यालयात अथवा कार्यालयाच्या आवारात अशा देणग्या किंवा भेट वस्तू प्रवेशद्वारातून आत नेण्यास संबंधितांना मज्जाव करावा, असा आदेशही आयुक्त शेखर सिंह यांनी सुरक्षा विभागाला दिला आहे. प्रभावी आणि लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हे प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांचे कर्तव्य आहे. त्यानुसार कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने कोणतेही देणगी अथवा भेट वस्तू स्वतः स्विकारता कामा नये, किंवा त्यांच्या कोणत्याही कुटुंबियाला किंवा त्यांच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तीला देणगी अथवा भेट वस्तू स्विकारण्यास परवानगी देता कामा नये, असे परिपत्रकात नमूद केले आहे. नागरिक ठेकेदार अथवा अन्य कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थांकडून भेट वस्तू अथवा देणग्या स्विकारु नयेत किंवा त्यांच्या कोणत्याही कुटुंबियाला किंवा त्यांच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तीला देणगी अथवा भेट वस्तू स्विकारण्यास परवानगी देऊ नये, असे या परिपत्रकाद्वारे महापालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना कळविण्यात आले आहे. आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांच्या निदर्शनास हे परिपत्रक आणून द्यावे, अशा स्पष्ट सूचना सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.