हायलाइट्स: ‘
सवलतीचा कालावधी देण्यास डिझेल विक्रेत्यांचा नकार
अनेक विभागांतील एसटी फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की
एसटीचे दैनंदिन उत्पन्न थकीत पगारासाठी वापरले
MSRTC News : दिवाळी तोंडावर आली आहे. आणि ऐन हंगामात एसटीला ब्रेक लागला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये डिझेलअभावी एसटीच्या अनेक फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारकडून निधी मिळत नसल्याने ही वेळ आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार जमा झाला. पण प्रवाशांचे हाल होत आहेत.
एसटी महामंडळाला डिझेलचे पैसे भरण्यासाठी सवलतीचा कालावधी (क्रेडिट) देणे किरकोळ डिझेल विक्रेत्यांनी बंद केले आहे. यामुळे राज्यातील अनेक विभागांतील एसटी फेऱ्या डिझेलअभावी रद्द करण्याची नामुष्की महामंडळावर ओढवली आहे. राज्य सरकारकडून निधीसाठी हात आखडता असल्याने ऐन हंगामात एसटी प्रवाशांची नाकाबंदी होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.महाविकास आघाडी सरकारच्या काळात थेट कंपन्यांकडून डिझेल खरेदी करण्याऐवजी किरकोळ विक्रेत्यांकडून डिझेल खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. थेट कंपन्यांकडून डिझेल खरेदी करताना महामंडळाला १५ दिवसांचा सवलत कालावधी मिळत होता. किरकोळ विक्रेत्यांकडे हा कालावधी एक ते पाच दिवसांचा आहे. संबंधित पंपचालकांच्या श्रीमंतीवर हा कालावधी अवलंबून असतो. हा कालावधी उलटूनदेखील थकीत पैसे मिळाले नसल्याने डिझेल पंपचालकांनी सवलत कालावधी देणे बंद केले आहे, असे एसटीतील सूत्रांनी सांगितले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जुलै आणि ऑगस्टमध्ये प्रत्येकी शंभर कोटी रुपयांचा निधी दिला होता. सप्टेंबरमध्ये २०० कोटी रुपयांचा निधी महामंडळाकडे वर्ग करण्यात आला. ऑक्टोबरचा निधी अद्याप मिळालेला नाही. एसटी संपानंतर तत्कालीन राज्य सरकारने वेतनाची जबाबदारी घेण्याचे उच्च न्यायालयात मान्य केले होते. सरकारकडून निधी मिळाला नाही तर ही अडचण राज्यातील सर्वच विभागांत निर्माण होईल, असे भाकीतदेखील एसटी अधिकाऱ्यांनी वर्तवले आहे.
रोजच्या एसटी फेऱ्यांतून मिळणारे प्रवासी उत्पन्न प्रशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारासाठी वापरण्यात आले. या निधीच्या माध्यमातून बुधवारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा करण्यात आला. मुंबई विभागातील गाड्या चालवण्यासाठी पुरेसे डिझेल आहे. मात्र ते संपुष्टात आल्यावर निधीची आवश्यकता भासणार आहे. सध्या डिझेलची देणी थकल्याने पुणे, चंद्रपूर या विभागांतील काही एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून निधी उपलब्ध झाला नाही तर ऐन दिवाळीत राज्यातील एसटी वाहतूक ठप्प होण्याची भीती आहे, असे यंत्र विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.