पिंपरी, पुणे (दि. १४ डिसेंबर २०२४) क्रीडा व युवा सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय व पुणे जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धेत भैरवी महेश सरोदे हिने १७ वर्षे मुलींच्या गटात प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक पटकावले. बारामती येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये इयत्ता दहावीत शिकणारी भैरवी सरोदे हीने अंतिम स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करीत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा व रमेश नांदल या क्रीडाशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. पिंपरी चिंचवड एजुकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी भैरवी सरोदे हिला शुभेच्छा देऊन तिचे कौतुक केले.