पिंपरी, दि. ८ जुलै २०२३:- लेखा आणि वित्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पुर्ण केल्यानंतर निश्चितच एखाद्या नामांकित कंपनीत किंवा संस्थेत मोठ्या हुद्द्यावर काम मिळेल.तथापि त्यांनी या कामासोबतच आपला थोडा वेळ समाजसेवा करण्यासाठीही द्यावा असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्रीचंद्रकांत पाटील यांनी केले.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया, पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने ८ व ९ जुलै रोजी लेखा आणि वित्त क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मेगा परिषदेचे आयोजन महापालिकेच्या निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृहात करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते.या परिषदेला आमदार महेश लांडगे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, एकनाथ पवार, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊटंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष अनिकेत तलाठी, उपाध्यक्ष रणजित आगरवाल, विद्यार्थी कौशल्य संवर्धन मंडळाचे अध्यक्ष मंगेश किनरे, उपाध्यक्ष श्रीधर मुप्पाला, परिषद संचालक पियुष छाजेड,वैभव मोदी,लेखा आणि वित्त क्षेत्रातील शहरातील विद्यार्थी, व्यावसायिक आदी मान्यवर उपस्थित होते.
सनदी लेखापाल त्याप्रमाणे उद्योग तज्ञांशी संवाद साधून सविस्तर मार्गदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी या दोन दिवसाच्या परिषदेचे आयोजन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी विविध सनदी लेखापाल तसेच उद्योग तज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्याशी संवाद देखील साधला. त्यामध्ये सनदी लेखापाल सी. व्ही. चितळे यांनी कर आकारणीबद्दल तसेच डिजीटल मालमत्तेचे कर आकारणी आणि मिळणाऱ्या उत्पन्नाचे योग्य नियोजन याबद्दलही मार्गदर्शन केले. त्यानंतर सनदी लेखापाल जय छायरा यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत उद्योग क्षेत्रात होणाऱ्या बदलांबद्दल आणि भविष्यातील उज्ज्वल संधींबद्दल मार्गदर्शन केले. दुपारच्या तांत्रिक सत्रामध्ये सनदी लेखापाल अभय छाजेड यांनी लेखा आणि लेखापरिक्षण मानंकांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये आर्थिक फसवणूक कशी टाळावी आणि कर संपादन कायद्यातील तरतूदीबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली.या परिषदेचा पहिला दिवस आज उत्साहात पार पडला. या परिषदेत देशभरातून ५०० सीए विद्यार्थी सहभागी झाले होते. उद्या देखील शिबीराचे आयोजन करण्यात आलेले असून त्यामध्ये सनदी लेखापाल उमेश शर्मा, जिगर दोशी,अर्पित काबरा, राजेश शुक्ला आणि अरविंद खिंवसरा मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी शहरातील, लेखा व वित्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभाग घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या तसेच संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.आजच्या शिबीराचे प्रास्ताविक वैभव मोदी यांनी तर सुत्रसंचालन रुची बंसल,निधी कट्टी यांनी केले तर आभार पंकज पाटणी यांनी मानले.