पिंपरी, दि. २६ जून २०२३- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील नागरिकांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, उप आयुक्त विठ्ठल जोशी, मनोज लोणकर, रविकिरण घोडके, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी मनोज माछरे, कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळ पिंपरी चिंचवड शहराचे पदाधिकारी मिलिंद वेल्हाळ, नामदेव शिंत्रे, सुनिल पाटील, पांडूरंग पाटील, जगदीश पाटील, पी. बी. पाटील, ईश्वरा शिंदे, अतुल सरदार, कृष्णात पाटील तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने के. एस. बी. चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास उप आयुक्त विठ्ठल जोशी आणि रविकिरण घोडके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगरसदस्य बाबासाहेब त्रिभुवन, माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, सतिश काळे, गणेश दहिभाते, रविंद्र चव्हाण, धनाजी येळकर, देवेंद्र तायडे, कुशाग्र कदम, पांडुरंग पाटील, जगदीश परीट, ज्ञानेश्वर लोभे, कृष्णा पाटील, बंडोपंत कोटकर, विश्वनाथ स्वामी, सखाराम रेडेकर, अशोक दुर्गुळे, लहु पवार, मनोहर चौगुले, विलास सपकाळ, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे थोर समाजसुधारक, लोकांच्या मनातील एक आदर्श राजे होते. त्यांनी त्यांच्या कुशल प्रशासक नेतृत्वामुळे लोकोपयोगी अनेक उपाययोजना केल्या, सर्वांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या, समाजातील विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केले. लोककला, संस्कृती यांची जपणूक करण्यासाठी कलाकारांना मदत आणि प्रोत्साहन दिले, धरणे, विविध शाळा, विहीरी, कारखाने उभारण्यासाठी, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महत्वपुर्ण योजना राबविल्या. खऱ्या अर्थाने प्रशासकीय व्यवस्थेत काम करत असताना आपण सर्वांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे व्यापक विचार जोपासावेत असे मत महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी व्यक्त केले.महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधनपर्वाचे आयोजन २५ ते २६ जून रोजी करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन काल सायंकाळी महापालिकेच्या साई उद्यान, संभाजीनगर चिंचवड येथे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्या हस्ते आणि यशदाचे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते, परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमातून डॉ. बबन जोगदंड यांनी दहावी, बारावी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी माहिती व तंत्रज्ञान या विषयावर भर देऊन शिक्षण घ्यावे, परदेशातील विविध भाषा शिकून त्यावर प्रभुत्व मिळवावे जेणेकरून परदेशात नोकरी किंवा व्यवसायासाठी चांगल्या संधी मिळू शकतील, स्वत:चे पारपत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड अशी महत्वाची कागदपत्रे नेहमी अद्यावत ठेवावीत. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, वर्तमानपत्रातील बातम्या वाचन करून आपले ज्ञान अद्यावत ठेवावे असे मार्गदर्शन केले. यानंतर कोल्हापूर येथील गीतराधाई या संस्थेचे राजमोहन शिंदे आणि ज्ञानेश कोळी दिग्दर्शित ३५ कलाकारांसह महाराष्ट्रातील लोप पावत असलेली लोककला व संस्कृती यावर तीन तासाचा विशेष कार्यक्रम सादर केला. यामध्ये जुनी ग्रामीण गीते, शहरी गीते, शेतकरी गीते, वासुदेव, पिंगळा अशा विविध लोककला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. के. एस. बी. चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याभोवती तसेच साई उद्यान येथे उद्यान विभागाकडून फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.