सुकळी :प्रतिनिधी (सुखदेव गायकवाड )शेवगाव तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या १८ डिसेंबर रोजी पार पडत असून काल गुरुवार दि.१ डिसेंबर पर्यंत १२ सरपंच पदासाठी २५ तर सदस्य पदासाठी १२१ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याबाबतची माहिती तहसीलदार छगन वाघ व नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी दिली आहे.याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शुक्रवार २ डिसेंबर हा शेवटचा दिवस असून काल अखेरपर्यंत सरपंच पदासाठी २५ तर सदस्य पदासाठी १२१ अर्ज दाखल झालेले आहेत.दाखल सर्व अर्जांची सोमवार ५ डिसेंबर रोजी छाननी होणार असून बुधवार दि.७ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. एकूण १२ ग्रामपंचायतीचे ४० प्रभाग तयार करण्यात आले असून त्यातून ११६ सदस्य निवडून जाणार आहेत.व १२ ग्रामपंचायतीसाठी १२ सरपंच थेट जनतेतून निवडून जाणार आहेत.आजचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सरपंच व सदस्य पदासाठी दाखल अर्जाचा आकडा आज स्पष्ट होईल.असेही वाघ व बेरड यांनी म्हटले आहे.दरम्यान आज अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.