श्रीलंका आणि पीसीईटी मध्ये शैक्षणिक सामंजस्य करारपिंपरी, पुणे (दि.२९ ऑक्टोबर २०२३) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु), पीसीसीओई,
पीसीसीओईआर तसेच अन्य शैक्षणिक संकुलात शिक्षण घेणाऱ्या श्रीलंकन विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत श्रीलंका आणि पीसीईटी मध्ये शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. श्रीलंकेचे भारतातील वाणिज्य दूत डॉ. वल्सन वेथोडी, अनिता वल्सन वेथोडी यांच्यासह वाणिज्य दूत ( व्यवसायिक) शिरानी अरियारथने, दूतावासातील कार्यकारी सहाय्यक आकांशा शाह, व्हिसा सहाय्यक सुरश्री भट्टाचार्य, शिष्टाचार अधिकारी सुब्रमण्यम, पीसीईटी कार्यकारी संचालक डॉ गिरीश देसाई, पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी, प्रकुलगुरू डॉ. राजीव भारद्वाज, प्रबंधक डॉ. डी एन सिंग, आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या अधिष्ठाता डॉ. रोशनी राऊत आदी उपस्थित होते. या करारामुळे प्राध्यापक आणि विद्यार्थी देवाणघेवाण कार्यक्रम, प्रवेश प्रक्रिया आणि श्रीलंकन विद्यार्थ्यांना देऊ केलेल्या शिष्यवृत्तींसह, संशोधन आणि विकास, प्रगत तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांचा समावेश करण्यात आला. या करारामुळे श्रीलंका आणि पीसीईटीचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ यांच्यातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी मदत होईल असा विश्वास डॉ. वेथोडी यांनी व्यक्त केला. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.