पिपंरी : वल्लभनगर आगारातील पार्किंगमध्ये एसटी बस काढताना तिचा ब्रेक न लागल्याने ती समोर उभ्या असलेल्या शिवशाही बसवर आदळली. यावेळी शिवशाही बसच्या समोर तिचे ऑईल चेक करण्यासाठी उभ्या असलेल्या मॅकेनीक विभागातील साहाय्यक शिल्पा कैलास गेडाम (वय ३८) या दोन्ही बसच्यामध्ये सापडून अपघात झाला.
या अपघातात त्या गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.८) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी वल्लभनगर आगार प्रशासनाकडून पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार बस चालवणारा परतूर आगाराचा चालककम वाहक प्रशांत वाडकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परतूर (जालना) आगाराची बस पार्किंगधून काढण्यासाठी चालक प्रयत्न करत होता. मात्र, मध्ये अहमदपूर आगाराची (लातूर) बस उभी असल्याने परतूर आगाराच्या बसचा वाहक प्रशांत रमेश वाडकर हा अहमदपूर आगाराची बस बाजूला काढण्यासाठी त्या बसच्या चालकाच्या सीटवर बसला. त्याने ती बस सुरू केली मात्र, तिचा ब्रेक न लागल्याने ती समोर शिल्पा या ऑईल तपासत असलेल्या शिवशाही बसवर आदळली. या दोन्ही बसच्यामध्ये दबल्या गेल्याने शिल्पा गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी वल्लभनगर आगार प्रशासनाच्या वतीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.
…तर अपघात टळला असता
अहमदपूर आगाराच्या बस (एम एच २० बीएल २०३६) मध्ये केवळ साडेचार टक्के एअर (हवा) होती. साधारणपणे सहा टक्के एअर असेल तर ब्रेक लागतो. मात्र, गाडी सुरू होताना एअरचे प्रेशर नीट नसल्याने देखील हा अपघात झाला असावा असा अंदाज आागारातील कर्मचारी व्यक्त करत आहेत.
दोन्ही एसटी बसच्या काचा फुटलाअवघ्या काही सेकंदात झालेल्या अपघात इतका भीषण होत की, अहमपूर आगाराच्या ज्या बसने शिवशाही बसला धडक दिली. त्या शिवशाहीच्या काचा फुटल्या तसेच पुढील भागाचे नुकसान झाले. यासोबत अहमदपूर आगाराच्या देखील बसच्या काचा फूटून पुढील भाग चेंबला.