पिंपरी, दि. १४ ऑक्टोबर २०२२ :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील क आणि इ प्रभागातील स्थापत्य कार्यकारी अभियंत्यांचे कार्यभार बदलण्यात आले असून त्यांच्याकडे आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतंत्र आदेशाद्वारे नव्याने कार्यभार सोपवले आहेत. महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने तसेच कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार, क क्षेत्रीय कार्यालयात स्थापत्य विभागात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असलेले संजय घुबे यांच्याकडे आता इ क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागाचा देखील कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यांची आस्थापना क क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागात राहील. इ क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता रविंद्र पवार यांच्याकडे आता स्थापत्य उद्यान आणि स्थापत्य क्रीडा विभागांची नव्याने जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची आस्थापना स्थापत्य विभागात असणार आहे. दरम्यान, स्थापत्य विभागातील कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असणारे मनोज सेठिया यांची सहशहर अभियंता या पदावर पदोन्नती झाली आहे. सुरक्षा विभागाचे विभागप्रमुख म्हणून मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबतचे स्वतंत्र आदेशही नुकतेच आयुक्त शेखर सिंह यांनी निर्गमित केले आहेत.