पिंपरी, दि. १३ सप्टेंबर २०२२ : पिंपरी चिंचवड शहरातील बायोमेट्रीक नोंदणी न झालेल्या पात्र पथविक्रेत्यांची नोंदणी करण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुसार त्यांना ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत बायोमेट्रीक नोंदणी करता येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली. महापालिकेच्या वतीने सन २०१४ मध्ये शहरातील पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या पथविक्रेत्यांची पूर्वी बायोमेट्रीक नोंदणी करण्यात आली होती. तथापि, काही पथविक्रेत्यांची बायोमेट्रिक नोंदणी करण्याचे काम शिल्लक होते. उर्वरित पात्र पथविक्रेत्यांची बायोमेट्रीक नोंदणी करण्याकरीता दि.२५ जुलै ते ३० ऑगस्ट २०२२ इतका कालावधी देण्यात आला होता. या कालावधीमध्ये अनेक पात्र फेरीवाल्यांची बायोमेट्रीक नोंदणी करण्यात आली आहे. दरम्यान, काही पात्र फेरीवाल्यांची नोंदणी दिलेल्या मुदतीत पूर्ण झाली नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी फेरीवाल्यांच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीचा विचार करून उर्वरित सर्व पात्र पथविक्रेत्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी दि. ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत बायोमेट्रीक नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. बायोमेट्रीक नोंदणी करण्यासाठी पात्र पथविक्रेत्यांनी आपल्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयात आवश्यक कागदपत्रे आणि आधारकार्डसह सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ या कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपली नोंदणी करून घ्यावी असे भूमी जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांनी सांगितले. तसेच कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी नोंदणी बंद राहील असेही त्यांनी सांगितले.