बीड जिल्ह्यात अवैध सावकारांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; तक्रार निवारण कक्षाची स्थापना!
शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर; अवैध सावकारांवर कठोर कारवाईचे आदेश
बीड | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात अवैध सावकारीच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची होणारी पिळवणूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हास्तरावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचे आदेश १६ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ नुसार अवैध सावकारी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अवैध सावकारांकडे अडकलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी व अडचणींच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यावर भर देण्यात आला आहे.
तक्रारींसाठी व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर
जिल्हाधिकारी कार्यालयाने तक्रार निवारणासाठी ९३०७३२५५८६ हा व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर केला आहे. हा क्रमांक २४ तास सुरू राहणार असून नागरिकांनी अवैध सावकारी, शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि नवीन पीककर्जासंबंधीच्या तक्रारी या क्रमांकावर नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
तीन अधिकाऱ्यांचा विशेष कक्ष
जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्षात उपजिल्हाधिकारी सतीश सोनी यांची कक्षप्रमुख म्हणून, तर सहायक निबंधक ऋषिकेश काळे आणि सहायक लीड बँक व्यवस्थापक श्रीकांत लोखंडे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळण्यासाठी पुढाकार
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१६ अंतर्गत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित बँकांनी तातडीने कार्यवाही करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
आधार प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनीही तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.
अवैध सावकारांविरोधात कारवाईचे निर्देश
अवैध सावकारी करणाऱ्यांची पडताळणी करून दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. तसेच सावकारांकडे अडकलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी व अडचणींबाबत त्वरित कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या निर्णयामुळे अवैध सावकारीविरोधात तक्रार करण्यासाठी शेतकरी व नागरिकांना जिल्हास्तरावर स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध झाली आहे.