खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ५० हजारांची खंडणी; आरोपीला अटक

तरुणाच्या मैत्रिणीकडेही केली शरीरसुखाची मागणी; पिंपरी-चिंचवड खंडणीविरोधी पथकाची कारवाई
पिंपरी-चिंचवड : सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून तरुणाचे खासगी फोटो मिळवल्यानंतर ते प्रसारित करण्याची धमकी देत ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एका आरोपीला खंडणीविरोधी पथकाने अटक केली. आरोपीने संबंधित तरुणाच्या मैत्रिणीकडेही शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. त्याच्याकडून मोटारसायकल, मोबाइल व इतर साहित्य असा एकूण एक लाख चार हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.हनुमान सुभाष खरात (वय ३५, सध्या रा. महादेव गोगावले यांच्या खोलीत, वासोली फाटा, वासोली, ता. खेड, जि. पुणे; मूळ रा. वरुडी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने खंडणीविरोधी पथकाच्या मोरवाडी येथील कार्यालयात येऊन तक्रार दिली होती. ‘RuchitaNikam93’ नावाच्या बनावट इन्स्टाग्राम खात्यावरून मुलगी असल्याचे भासवत त्याच्याशी संपर्क साधण्यात आला. खासगी फोटो पाठवण्यास सांगून त्याचे फोटो मिळवण्यात आले. त्यानंतर हे फोटो एका अनोळखी व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावरून फिर्यादीला व्हॉट्सॲपवर पाठवण्यात आले.‘तुझे खासगी फोटो माझ्याकडे आले आहेत. तू काम करत असलेल्या कार्यालयातील मोबाइलवर, तसेच पार्टटाइम नोकरीच्या ठिकाणीही ते पाठवीन. फोटो पाठवायचे नसतील तर ५० हजार रुपये द्यावे लागतील,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. पैसे न दिल्यास ठार मारण्याचीही धमकी देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.याचदरम्यान, फिर्यादीच्या मैत्रिणीलाही व्हॉट्सॲपवर संदेश पाठवून तिच्या मित्राचे फोटो प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली. फोटो प्रसारित करायचे नसतील तर शारीरिक संबंध ठेवावेत अथवा तिच्या क्रमांकावरून पैसे पाठवावेत, अशी मागणी केल्याचा आरोप आहे. यासोबतच मित्रांकडून मारहाण करवण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.फिर्यादीला ‘Bhalchandra Aher’ नावाच्या फेसबुक खात्यावरूनही संदेश पाठवण्यात आला. त्यात खासगी फोटो असल्याचे सांगून, संबंधित बनावट खात्याशी आपला संबंध नसल्याचा दावा करत फिर्यादीविरुद्ध सायबर तक्रार करण्याची धमकी देण्यात आली होती.या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३०८(३), ३५१(२) आणि ७५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल झाल्यानंतर खंडणीविरोधी पथकाने संबंधित मोबाइल क्रमांकाचा तांत्रिक तपास केला. त्याआधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक मोटारसायकल, एक मोबाइल, एक पाकीट, आधारकार्ड व इतर साहित्य जप्त करण्यात आले. आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी संत तुकारामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वीही अपहरणाचे दोन गुन्हे दाखल असल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त स्नेहा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमर राऊत, रमेश गायकवाड, तसेच सुनील कानगुडे, प्रदीप पोटे, किरण जाधव, प्रदीप गोडांबे, किशोर कांबळे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे आणि दादाभाऊ साबळे यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.अशाप्रकारे कोणाकडून खंडणीची मागणी होत असल्यास अथवा कोणी पीडित असल्यास खंडणीविरोधी पथक, गुन्हे शाखा किंवा संत तुकारामनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

