औरंगाबाद : घाटी रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी अद्ययावत सुविधा मिळणे गरजेचे आहे. घाटीत पायाभूत सुविधा निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्री संदिपान भूमरे यांनी सांगितले. घाटी रुग्णालयाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते.या बैठकीस आमदार प्रदीप जैस्वाल, घाटी रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.वर्षा रोटे, स्त्रीरोग व प्रसुती विभागाचे प्रमुख डॉ.विजय कल्याणकर उपअधिष्ठाता डॉ.एम.एस.बेग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिरडे, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता श्री. येरेकर, डॉ.शेंडगे, महावितरणचे चिंचनकर यांची उपस्थिती होती. घाटीच्या सुपर स्पेशालिटी इमारतीत रुग्णांच्या उपचारासाठी नर्स, डॉक्टर याबरोबरच पॅरामेडिकल स्टाफ उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रसुती वार्डात अतिरिक्त खाटाच्या उपलब्धेसाठी प्रशासकीय मान्यता,व निधी देण्यात येणार असल्याची माहिती भूमरे यांनी दिली. तसेच कर्करोग रुग्णालयातील सुविधा, परिसरातील संरक्षण भिंतीचे 10 फुटापर्यंत वाढीव बांधकाम, अतिक्रमण, नर्सिगच्या वस्तीगृहाची दुरुस्ती आणि ड्रेनेजलाईन बाबत पुर्नप्रस्ताव सादर करण्याचे निर्देश घाटी रुग्णालय व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री यांनी दिले. बहुमजली वाहनतळ इमारतीसाठीचा सुधारीत प्रस्ताव सादर करुन यात ॲटोरिक्षासाठी जागा राखीव ठेऊन अग्नीरोधक यंत्रणातील उर्वरित कामाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा असे निर्देश यावेळी देण्यात आले. स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सुरक्षारक्षकाच्या संख्येत वाढ करण्याची मागणी बरोबर घाटी रुग्णालय व महाविद्यालयातील विविध विभागवार माहिती अधिष्ठाता डॉ.वर्षा रोटे यांनी पालकमंत्री यांना बैठकीत सादर केली.